अनधिकृत होर्डिंगविरोधात महानगरपालिकेची धडक कारवाई; दंडासह खर्चही वसूल होणार!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १२ :- शहरातील रस्ते, चौक, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक आणि बॅनर्सविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. शहरभर विशेष मोहीम राबवून अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील विविध भागांमधील जाहिरात फलकांची पाहणी करून माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परवानगी न घेता उभारण्यात आलेले तसेच मंजूर परवानगीच्या अटींचे उल्लंघन करणारे होर्डिंग तातडीने हटविले जाणार आहेत.
रस्त्यांच्या कडेला, चौकांमध्ये, पदपथांवर, सार्वजनिक जागांमध्ये तसेच शासकीय आणि महानगरपालिका मालमत्तेवर उभारण्यात आलेल्या फलकांवर प्राधान्याने कारवाई केली जाणार आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे होर्डिंगही कारवाईच्या केंद्रस्थानी असतील.
या कारवाईत केवळ होर्डिंग हटविण्यावर प्रशासन थांबणार नसून संबंधित होर्डिंगधारक, जाहिरातदार, जाहिरात एजन्सी आणि जागामालक यांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. नियमांनुसार दंडात्मक कारवाई, होर्डिंग जप्त करणे तसेच कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
दरम्यान, अधिकृत होर्डिंगधारक आणि जाहिरातदारांनी महानगरपालिकेची आवश्यक परवानगी घेऊनच जाहिरात फलक उभारावेत. परवानगीशिवाय कोणतेही होर्डिंग किंवा बॅनर लावू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नागरिकांनीही आपल्या परिसरातील अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक किंवा बॅनर्सची माहिती महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
“शहराचे विद्रुपीकरण, वाहतुकीस अडथळा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंगविरोधातील कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार आहे,” असा इशारा महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिला.