माहिती अधिकारीपदी संजीवनी जाधव-पाटील रुजू
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १० :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे माहिती अधिकारी म्हणून संजीवनी जाधव-पाटील नुकत्याच रुजू झाल्या आहेत. त्यांच्या रुजू होण्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
मूळच्या छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या संजीवनी जाधव-पाटील यांना पत्रकारिता तसेच माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी उप माहिती कार्यालय, शिर्डी येथे उपसंपादक, त्यानंतर विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई येथे सहायक संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
जाधव-पाटील यांनी पत्रकारितेतील बी.जे., एम.जे. तसेच एम.फिल. पदव्या प्राप्त केल्या आहेत. प्रशासन सेवेत येण्यापूर्वी त्यांनी दैनिक लोकपत्रमध्ये उपसंपादक म्हणून काम केले आहे. याशिवाय आकाशवाणी केंद्रात प्रादेशिक वृत्तनिवेदिका तसेच एमसीएन (माध्यम) वृत्तवाहिनीमध्ये निवेदिका म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.
पत्रकारिता, वृत्तनिवेदन आणि माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाला अधिक प्रभावीपणे चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.