. पंकजाताई मुंडेंकडून हाजी एजाज देशमुख कुटुंबाला ५ लाखांची मदत; शिष्यवृत्ती योजनेचीही घोषणा”
सलीम जहाँगीर यांचा पुढाकार; शोकसभेस जमाल सिद्दीकींसह मान्यवरांची उपस्थित
महाराष्ट्र वाणी
बीड (प्रतिनिधी) दि २८ :- दिवंगत हाजी एजाज देशमुख हे स्व. गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत लाडके व विश्वासू कार्यकर्ते होते. अल्पसंख्यांक आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे पक्षाने एक निष्ठावान, शांत आणि तळमळीचा कार्यकर्ता गमावला, अशा शब्दांत राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी त्यांनी स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने देशमुख कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच हाजी एजाज देशमुख यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती योजना राबवून ३ गरजू मुलींना डॉक्टर बनविण्याची घोषणाही त्यांनी केली.
महाराष्ट्र भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश महामंत्री सलीम जहाँगीर यांच्या पुढाकाराने बीड येथील हॉटेल गोल्डन चॉइस येथे हाजी एजाज देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोकसभेला भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय नेते जमाल सिद्दीकी, प्रदेशाध्यक्ष ईद्रीस मुलतानी, मा. आ. संजय केणेकर, डॉ. योगेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, वसीम खान, उमेर सलीम, कल्याण आखाडे, काझी मकदूम, हसीन अख्तर, प्रा. सुशीलाताई मोराळे, मोईन मास्टर, फारुक पटेल, आदित्य सारडा, नवनाथ शिराळे, दिलीप गोरे, ॲड. शेख शफीकभाऊ, सय्यद नवीदुजमा, खुर्शीद आलम, जयतुला खान, नूर लाला यांच्यासह विविध पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की,
“दिवंगत एजाज देशमुख हे अत्यंत शांत, संयमी आणि नेहमी चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवणारे कार्यकर्ते होते. त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी निस्वार्थ भावनेने काम केले. त्यांच्या जाण्याने मुंडे साहेबांच्या विचारांवर चालणारा एक सक्रिय कार्यकर्ता आपण गमावला आहे.”
शोकसभेत उपस्थित मान्यवरांनीही दिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्यपद्धती, निष्ठा आणि समाजसेवेच्या भावनेचे कौतुक केले. त्यांच्या कार्यामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
“निस्वार्थ सेवेची परंपरा जपणाऱ्या एजाजभाईंची आठवण आता कार्यातूनच जिवंत ठेवावी, अशीच सर्वांची भावना व्यक्त झाली.”