मुकुंदवाडी भाजीमंडईत थरारक खून; गुन्हे शाखेची झटपट कारवाई — ३ आरोपी जेरबंद!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि ३० :- मुकुंदवाडी भाजीमंडई परिसरात दुपारी घडलेल्या थरारक खूनप्रकरणी गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत ३ आरोपींना अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे शहर पोलीस दलाची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 30 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 12.45 वाजता मुकुंदवाडी भाजीमंडई येथे दत्ता गणपत रोकडे या सराईत गुन्हेगाराने किशोर रावसाहेब हिवाळे (वय 24, रा. राजनगर, मुकुंदवाडी) याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात किशोर हिवाळे याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी तात्काळ पथक घटनास्थळी रवाना करून आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस अंमलदार मनोहर गिते यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी दत्ता रोकडे हा मसनतपुर परिसरात लपून बसल्याचे समजले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
त्यानंतर चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसरा आरोपी शुभम सिद्धार्थ रणशुर (वय 18, रा. MIDC चिकलठाणा परिसर) याला MIDC सिडको पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. तसेच तिसरा आरोपी कांतीलाल दौलतराव भुईगळ (वय 55, रा. मसनतपुर) यालाही मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगोले (मुकुंदवाडी पोलीस ठाणे) करत आहेत. मुख्य आरोपी दत्ता रोकडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर MIDC सिडको, मुकुंदवाडी व जवाहरनगर पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर खुनाचा गुन्हाही नोंद असून दोन वेळा MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
👉 थरारक घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत — पुढे काय उलगडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!