“इंधन बचतीचा भन्नाट फॉर्म्युला!” बैलगाड्यांवरून ठाकरेंचे नगरसेवक थेट मनपेत; पोलिसांनी अडवल्याने परिसरात खळबळ

“इंधन बचतीचा भन्नाट फॉर्म्युला!” बैलगाड्यांवरून ठाकरेंचे नगरसेवक थेट मनपेत; पोलिसांनी अडवल्याने परिसरात खळबळ
“इंधन बचतीचा भन्नाट फॉर्म्युला!” बैलगाड्यांवरून ठाकरेंचे नगरसेवक थेट मनपेत; पोलिसांनी अडवल्याने परिसरात खळबळ

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २० :- पेट्रोल-डिझेल टंचाई, वाढते दर आणि इंधन बचतीचा मुद्दा ऐरणीवर असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी आज अनोख्या आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधले. थेट बैलगाड्यांच्या जोड्या घेऊन महानगरपालिकेत दाखल झालेल्या नगरसेवकांनी “इंधन वाचवा”चा संदेश देत जोरदार घोषणाबाजी केली.

महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर बैलगाड्या पाहताच नागरिकांची मोठी गर्दी झाली. पारंपरिक बैलगाड्यांमधून आलेल्या नगरसेवकांचा हा अनोखा अंदाज शहरात चर्चेचा विषय ठरला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकार आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत इंधन संकटावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, बैलगाड्यांसह मनपेत प्रवेश करण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी नगरसेवकांना अडवले. काही काळ प्रवेशद्वारावरच पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत आंदोलन शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.

नगरसेवकांनी यावेळी सांगितले की, “सामान्य नागरिक पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त झाले आहेत. इंधन बचतीबाबत केवळ भाषणे नकोत, तर प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही बैलगाडीतून येत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.”

या अनोख्या आंदोलनामुळे मनपा परिसर काही काळ गजबजून गेला होता. नागरिकांनीही मोबाईलमध्ये या आंदोलनाचे व्हिडिओ आणि फोटो टिपत मोठी उत्सुकता दाखवली.

“राजकारणात आरोप-प्रत्यारोप नेहमीच होतात… पण बैलगाडीतून मनपेत एन्ट्री घेत ठाकरेंच्या नगरसेवकांनी आज शहराचे लक्ष वेधून घेतले!”