रस्त्यावर थांबलेल्या फोटोग्राफरची बॅग हिसकावली; MIDC सिडको पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आरोपी जेरबंद

रस्त्यावर थांबलेल्या फोटोग्राफरची बॅग हिसकावली; MIDC सिडको पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आरोपी जेरबंद

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १६ :- रस्त्यावर उभ्या असलेल्या एका तरुण फोटोग्राफरची कॅमेऱ्यांनी भरलेली बॅग हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला MIDC सिडको पोलिसांनी अटक करत तब्बल १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी चैतन सोमेश जैस्वाल (वय १९, व्यवसाय – फोटोग्राफर, रा. तिरंगा चौक, रेल्वे स्टेशन परिसर) यांनी फिर्याद दिली होती. दि. १ मे २०२६ रोजी तिरंगा हॉटेलजवळ, बीड बायपास रोड येथे ते उभे असताना आरोपींनी त्यांच्या हातातील कॅमेऱ्यांची बॅग हिसकावून नेली होती. यानंतर MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, दि. १५ मे रोजी सकाळी MIDC सिडको पोलीस गुन्हेशाखेचे पथक सातारा, उस्मानपुरा, जवाहरनगर, पुंडलिकनगर आणि मुकुंदवाडी परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कार्तीक कैलास जाधव (वय १९, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने साथीदार शंकर शेलार आणि एका विधी संघर्ष बालकासह मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेले दोन व्हिडीओ शूटिंग कॅमेरे, त्यांच्या बॅटऱ्या तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात शंकर शेलार हा अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि जगन्नाथ मेनकुदळे, शोन पवार, सुनिल जाधव, सुनिल पाटील, वाडीलाल जाधव, दीपक शिंदे आदींच्या पथकाने केली.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

“शहरात गुन्हे करून सुटणे आता कठीण आहे, MIDC सिडको पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे!”