NEET पेपरफुटी प्रकरण तापलं; CBIच्या रडारवर विद्यार्थी, पालक आणि आर्थिक व्यवहार

NEET पेपरफुटी प्रकरण तापलं; CBIच्या रडारवर विद्यार्थी, पालक आणि आर्थिक व्यवहार

महाराष्ट्र वाणी

पुणे दि २१ :- देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अधिक तीव्र झाला असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणातील प्रत्येक धागा शोधण्यासाठी सखोल चौकशी मोहीम सुरू केली आहे. तांत्रिक पुरावे, आर्थिक व्यवहार आणि विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका कशा पोहोचल्या याचा तपास वेगाने केला जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, CBIकडून दररोज सुमारे दहा ते पंधरा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चौकशी केली जात आहे. लातूरमधील ‘RCC’ क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याच्या मुलासह काही विद्यार्थ्यांना पेपरफुटीचा लाभ झाला का, यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मंगळवारी मोटेगावकर यांच्या मुलाची जवळपास पाच ते सहा तास चौकशी करण्यात आली.

तपासाच्या अनुषंगाने RCC क्लासेसमधील विद्यार्थ्यांना पालकांसह CBI कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या चौकशीत विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेले प्रश्न, अचूक उत्तरे आणि त्यामागील संपर्क साखळीचा तपास सुरू आहे.

या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील चौकशी केली जात आहे. प्राध्यापक शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांच्याकडेही चौकशीचा फेरा वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, पेपरफुटीमध्ये आर्थिक व्यवहारांची मोठी साखळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पैशांची देवाणघेवाण, मध्यस्थ आणि विद्यार्थ्यांशी झालेले संपर्क यांचा तपास CBIकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिक्षिका मनीषा मांढरे यांच्या महाविद्यालयातील लॉकरचीही तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान काही जुन्या प्रश्नपत्रिका आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीहून आलेले CBIचे विशेष पथक सध्या पुण्यात तळ ठोकून असून, या तपासातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाचा, शेअर करा आणि अपडेट राहा — महाराष्ट्र वाणीसोबत!