जुन्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! HSRP प्लेटची अंतिम मुदत आता ३० जून २०२६ पर्यंत

जुन्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! HSRP प्लेटची अंतिम मुदत आता ३० जून २०२६ पर्यंत

महाराष्ट्र वाणी

मुंबई (प्रतिनिधी) दि १४ :- राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक प्रभावी बनविण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक ठेवण्याच्या उद्देशाने शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना आता उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविणे अनिवार्य करण्यात आले असून, ही अंमलबजावणी १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे.

यापूर्वी वाहनधारकांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्यातील कामाचा वेग आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सरकारने मोठा दिलासा देत ही मुदत आता ३० जून २०२६ पर्यंत वाढवली असल्याची माहिती परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी दिली.

केंद्र सरकारच्या नियमांनुसार HSRP प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत प्लेट न बसविल्यास संबंधित वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. तसेच, अशा वाहनांवर एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाण्याची शक्यता आहे.

वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP साठी नोंदणी करून आगाऊ वेळ निश्चित करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोणत्याही अनधिकृत एजंट किंवा दलालांच्या आमिषाला बळी पडू नये, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

‘महाराष्ट्र वाणी’ — तुमच्या हक्काच्या आणि विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी!