सिल्लोड–सोयगावच्या आरोग्य प्रश्नांवर मुंबईत उच्चस्तरीय बैठक; रुग्णालये, अॅम्बुलन्स व डॉक्टरांच्या कमतरतेवर तातडीने उपाययोजना
महाराष्ट्र वाणी
मुंबई (प्रतिनिधी) दि ६ :- मुंबई येथील आरोग्य भवन, आरोग्य सेवा आयुक्तालयात आरोग्यमंत्री मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील आरोग्य विषयक प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील प्रलंबित व अत्यावश्यक आरोग्य समस्या सविस्तरपणे मांडल्या.
या बैठकीस प्रधान सचिव निपुण विनायक, आयुक्त (आरोग्य) डॉ. सुनील भोकरे, डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंधेवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुतखेडकर यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सिल्लोड येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करण्यावर भर देण्यात आला. तसेच सोयगाव (५० खाट) व अजिंठा रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मिती, भरती प्रक्रिया व यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. अंधारी, भराडी, अंभई येथील आरोग्य केंद्रे सुरू करणे आणि फर्दापूर, अजिंठा, भराडी, गेवराई सेमी आदी ठिकाणी डॉक्टर व सुविधा वाढवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
याशिवाय आमठाणा, उंडणगाव व पानवडोद येथील जीर्ण आरोग्य इमारतींच्या जागी नवीन इमारती उभारणे, सिल्लोड येथे ६० खाटांचे स्त्री रुग्णालय सुरू करणे, 102 व 108 अॅम्बुलन्स सेवा वाढवणे, तसेच सोयगाव येथे नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. फर्दापूर येथे डॉक्टरांसाठी निवास व्यवस्था उभारणे व उपकेंद्रांना बळकटी देण्याबाबतही पाठपुरावा करण्यात आला.
अजिंठा रुग्णालयाची प्रलंबित देयके, संरक्षण भिंत, निधी मंजुरी, नॅशनल हॉस्पिटल सिल्लोड येथे रेफरल सुविधा व शासकीय योजना लागू करणे, ऑक्सिजन पुरवठा आणि रस्त्याच्या मंजुरीसारखे महत्त्वाचे विषयही चर्चेत आले.
या सर्व मुद्द्यांवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच 102 व 108 रुग्णवाहिका व्यवस्थेसाठी आणि मतदारसंघातील आरोग्य समस्या सोडवण्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
👉 “आरोग्य सेवा सक्षम झाल्या तरच ग्रामीण भागाचा विकास वेगाने होईल,” असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.