६ महिन्यांपासून बेवारस अवस्थेत असलेल्या मनोरुग्ण महिलेला पोलिसांची माणुसकी; ‘माणुसकी वृद्ध सेवालयात’ पुनर्वसन

६ महिन्यांपासून बेवारस अवस्थेत असलेल्या मनोरुग्ण महिलेला पोलिसांची माणुसकी; ‘माणुसकी वृद्ध सेवालयात’ पुनर्वसन
६ महिन्यांपासून बेवारस अवस्थेत असलेल्या मनोरुग्ण महिलेला पोलिसांची माणुसकी; ‘माणुसकी वृद्ध सेवालयात’ पुनर्वसन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १५ :- जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सिंधी कॉलनी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून बेवारस अवस्थेत राहणाऱ्या एका मनोरुग्ण तरुणीला अखेर पोलिसांनी माणुसकी दाखवत सुरक्षित निवारा मिळवून दिला. पोलिसांच्या पुढाकाराने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील पुनर्वसनासाठी ‘माणुसकी वृद्ध सेवालय’ येथे दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला तिच्या वडिलांसोबत सिंधी कॉलनीतील मंदिरासमोर गेल्या सहा महिन्यांपासून राहत होती. आईच्या निधनानंतर हे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. वडीलही मानसिक आजाराने त्रस्त असून त्यांना दारूचे व्यसन असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे महिला अत्यंत बिकट परिस्थितीत राहत होती.

परिसरात दुर्गंधी पसरल्याने आणि नागरिकांना त्रास होत असल्याने सिंधी समाजातील काही जागरूक नागरिकांनी मंदिराच्या ट्रस्टमार्फत तिला तात्पुरता आसरा म्हणून बांधकामासाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र तरुणीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही अपप्रकार घडू नये, म्हणून नागरिकांनी ही बाब जवाहरनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या निदर्शनास आणून दिली.

पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी तत्काळ ‘सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था’ व ‘माणुसकी समूह’ाशी संपर्क साधला. त्यानंतर माणुसकी वृद्ध सेवालयाचे सुमित पंडित व पूजा पंडित यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. सिंधी समाजातील ट्रस्ट अध्यक्ष शंकर बजाज, ओमप्रकाश बजाज, भरत निहालानी, सेवकराम तोलवाणी, गणेश पदवाणी, पुरुषोत्तम इसराणी, विनोद चोटलाणी यांच्याशी चर्चा करून महिलेच्या पुनर्वसनाची जबाबदारी माणुसकी समूहाने स्वीकारली.

यानंतर पोलिसांच्या मदतीने संबंधित महिलेला प्रथमोपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला मानसिक आजार असल्याचे सांगत उपचार सुरू केले. पुढील सुरक्षेसाठी व पुनर्वसनासाठी तिला गावंदरी तांडा येथील माणुसकी वृद्ध सेवालयात दाखल करण्यात आले.

या मदतकार्यात पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी (झोन २), सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक सचिन कुंभार, पोलीस उपनिरीक्षक मारुती खिल्लारे, पोलीस अंमलदार बनकर, महिला पोलीस अंमलदार एच.एस. आघाडे, तसेच माणुसकी समूहाचे सुमित पंडित व पूजा पंडित यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

समाजातील दुर्लक्षितांना आधार देणारी ही माणुसकीची कृती समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.