काँग्रेसचा ‘दिलदार’ चेहऱ्यावर विश्वास; एड. सय्यद अक्रम शहराध्यक्ष, डोणगावकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी कायम

काँग्रेसचा ‘दिलदार’ चेहऱ्यावर विश्वास; एड. सय्यद अक्रम शहराध्यक्ष, डोणगावकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी कायम
काँग्रेसचा ‘दिलदार’ चेहऱ्यावर विश्वास; एड. सय्यद अक्रम शहराध्यक्ष, डोणगावकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी कायम

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद), दि. २१ :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील विविध शहर व जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांची घोषणा गुरुवारी केली. या घोषणेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा किरण पाटील डोणगावकर यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला असून शहर जिल्हाध्यक्षपदी एड. सय्यद अक्रम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असताना पक्षाने युवा आणि संघटनात्मक कामात सक्रिय असलेल्या एड. सय्यद अक्रम यांच्याकडे जबाबदारी सोपवली. काँग्रेसशी दीर्घकाळ एकनिष्ठ राहून त्यांनी विविध आंदोलनांमध्ये आक्रमक भूमिका घेतली होती. पद असो वा नसो, पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या अक्रम यांना पक्षाने दिलेली ही मोठी संधी मानली जात आहे.

संभाजीनगर शहरात काँग्रेसची सध्याची राजकीय स्थिती कमकुवत मानली जाते. महापालिकेत पक्षाची केवळ एकच नगरसेविका असून शहरात काँग्रेसचा एकही आमदार नाही. त्यामुळे पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचे मोठे आव्हान नव्या नेतृत्वासमोर असणार आहे. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना एड. सय्यद अक्रम यांनी शहरात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

अक्रम यांनी यापूर्वी २०१४ मध्ये शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले असून युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.

दरम्यान, काँग्रेसने राज्यभर जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष निवडीसाठी ‘सृजन अभियान’ राबवले होते. प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक नेमून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला होता. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली.

महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि शहरांतील नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नव्याने नियुक्त झालेल्या नेत्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

“संभाजीनगर काँग्रेसला नव्या नेतृत्वाची दिशा; आता संघटना किती मजबूत होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.”