“डॉ. सलीम अली तलाव होणार जागतिक दर्जाचे वॉटरफ्रंट; जावेद कुरेशी आणि CivilHub कडून महत्त्वाकांक्षी विकास आराखडा सादर”

“डॉ. सलीम अली तलाव होणार जागतिक दर्जाचे वॉटरफ्रंट; जावेद कुरेशी आणि CivilHub कडून महत्त्वाकांक्षी विकास आराखडा सादर”
“डॉ. सलीम अली तलाव होणार जागतिक दर्जाचे वॉटरफ्रंट; जावेद कुरेशी आणि CivilHub कडून महत्त्वाकांक्षी विकास आराखडा सादर”

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २० :- शहरातील ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या डॉ. सलीम अली तलावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक दूरदृष्टीपूर्ण आणि शाश्वत आराखडा सादर करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते जावेद कुरेशी आणि CivilHub च्या तांत्रिक टीमने हा महत्त्वाकांक्षी संकल्पना प्रस्ताव आज माननीय महानगर आयुक्त आणि माननीय महापौर यांच्यासमोर मांडला.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत तलावाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तलावाचे संवर्धन करत त्याला पर्यावरणपूरक, आधुनिक आणि जागतिक दर्जाचे सार्वजनिक वॉटरफ्रंट म्हणून विकसित करण्यासाठी पुढील नियोजन करण्याची विनंतीही करण्यात आली.

या प्रस्तावामध्ये तलावाच्या नैसर्गिक सौंदर्याचे आणि परिसंस्थेचे संरक्षण करत नागरिकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रस्तावित आराखड्यात पर्यावरणपूरक वॉटरफ्रंट विकास, वॉकिंग आणि सायकल ट्रॅक, तलाव संरक्षण व सीमासुरक्षा, शाश्वत सार्वजनिक सुविधा तसेच नैसर्गिक पर्यावरणाचे जतन यांचा समावेश करण्यात आला आहे.

“तलावाच्या मूळ परिसंस्थेला कोणताही त्रास न होता, सर्व कायदेशीर नियमांचे पालन करून जास्तीत जास्त सार्वजनिक हित साधले जाईल,” अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

या उपक्रमामुळे भविष्यात डॉ. सलीम अली तलाव शहरासाठी एक आकर्षक पर्यटनस्थळ, पर्यावरणपूरक सार्वजनिक जागा आणि नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीचे केंद्र ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“शहराच्या विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची नवी दिशा देणारा हा आराखडा आता प्रत्यक्षात येणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे!”