5 वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचा उलगडा; २४ तासांत आरोपी जेरबंद, पोलिसांचा ५५० किमी पाठलाग

5 वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचा उलगडा; २४ तासांत आरोपी जेरबंद, पोलिसांचा ५५० किमी पाठलाग
5 वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचा उलगडा; २४ तासांत आरोपी जेरबंद, पोलिसांचा ५५० किमी पाठलाग

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २१ :- चिकलठाणा परिसरात पाच वर्षीय बालकाची हत्या करून मृतदेह शेतात टाकून पसार झालेल्या महिला आणि पुरुष आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत अटक केली. अज्ञात अवस्थेत सापडलेल्या बालकाची ओळख पटवून पोलिसांनी तब्बल चार जिल्ह्यांत ५५० किलोमीटरचा पाठलाग करत ही कारवाई केली.

१९ मे रोजी सकाळी चिकलठाणा येथील गट क्रमांक २९९ मधील शेतात एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी एम. सिडको पोलीस ठाण्यात खूनासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळी पाहणी करून परिसरात चौकशी सुरू केली. सुरुवातीला मृत बालकाची कोणतीही ओळख पटत नसताना गुप्त माहितीच्या आधारे तो सावित्रीनगर, चिकलठाणा परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले.

तपासादरम्यान एका घरातील महिला आणि पुरुष अचानक फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी पुरुषाच्या आधारकार्डवरील माहितीच्या आधारे पोलिसांनी वाशीम, अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत शोधमोहीम राबवली. तब्बल ५५० किलोमीटरचा प्रवास करून नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली.

दरम्यान, दोन्ही आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथे लपल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांची नावे संतोष सोनाजी ढाळे आणि पूजा राजू पाडेवाड अशी आहेत.

दोन्ही आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथे आणल्यानंतर चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत बालकाचे आरोपींशी नेमके काय नाते होते, याचा तपास सध्या सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त रत्नाकर नवले आणि सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

“अज्ञात मृतदेहापासून आरोपींपर्यंतचा २४ तासांचा पोलिसांचा तपास आता शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.”