“शाळेतील शिक्षकांना घरगडी समजू नका!” संस्था चालकांना शिक्षण विभागाचा इशारा; खासगी कामे करवून घेतल्यास थेट शिस्तभंग कारवाई
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २० :- जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून संस्था चालकांच्या घरातील किंवा खासगी व्यवसायातील कामे करून घेतली जात असल्याच्या तक्रारींवर आता शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.
जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांनी दिलेल्या तक्रार निवेदनानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित तसेच अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक शाळांना स्पष्ट इशारा दिला आहे.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांनी 18 मे 2026 रोजी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, शाळांतील शिक्षक किंवा कर्मचारी संस्था चालकांच्या घरात अथवा खासगी व्यवसायाच्या ठिकाणी काम करताना आढळल्यास संबंधित कर्मचारी आणि मुख्याध्यापकांविरुद्ध थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
तक्रारीनुसार काही संस्था चालक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा शैक्षणिक कामांऐवजी वैयक्तिक कामांसाठी वापर करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
या आदेशामुळे खासगी शिक्षण संस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, शिक्षक संघटनांकडूनही या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
“शिक्षकांचा सन्मान राखला गेला पाहिजे; शिक्षणाचे मंदिर खासगी कामांचे केंद्र बनू नये,” अशी भावना अनेक शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
👉 महाराष्ट्र वाणीसोबत राहा… शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घडामोडीचा अचूक आणि थेट आढावा मिळवत राहा!