कुरेश कॉन्फरन्सचे 4 एप्रिलला बुलढाण्यात भव्य राष्ट्रीय अधिवेशन; समाजाच्या प्रश्नांवर होणार निर्णायक मंथन

कुरेश कॉन्फरन्सचे 4 एप्रिलला बुलढाण्यात भव्य राष्ट्रीय अधिवेशन; समाजाच्या प्रश्नांवर होणार निर्णायक मंथन

महाराष्ट्र वाणी

बुलढाणा/महाराष्ट्र दि ३० :- कुरेश बिरादरीच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच व्यापार क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्याच्या उद्देशाने कुरेश कॉन्फरन्स (Regd.) यांच्या वतीने चौथे राष्ट्रीय अधिवेशन 4 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राष्ट्रवादी भवन, मलकापूर रोड, बुलढाणा येथे पार पडणार आहे.

या महत्त्वपूर्ण अधिवेशनासाठी राज्यभरातून समाजाचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कुरेश कॉन्फरन्सचे मुख्य प्रवक्ता अॅड. वसीम कुरेशी यांनी सांगितले की, अधिवेशनात बिरादरीसमोरील विविध समस्यांवर गांभीर्याने चर्चा करून ठोस निर्णय घेतले जाणार आहेत. विशेषतः सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि व्यापाराशी संबंधित मुद्द्यांवर सखोल मंथन होणार आहे.

यावेळी अधिवेशनाचे विशेष आकर्षण म्हणून महाराष्ट्रातील नुकतेच निवडून आलेल्या कुरेशी समाजातील नवनियुक्त नगरसेवकांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. तसेच समाजाच्या राजकीय सहभाग आणि प्रतिनिधित्व वाढविण्याबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा होणार असून, हे अधिवेशन समाजाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

शेवटी अॅड. वसीम कुरेशी यांनी समाजातील सर्व बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करत अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

 “एकत्र येऊ, विचार करू आणि समाजाला नवी दिशा देऊ” — 4 एप्रिलला बुलढाण्यात होणाऱ्या या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.