खरिपासाठी प्रशासन सज्ज! खतांचा तुटवडा नाही; काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे निर्देश

खरिपासाठी प्रशासन सज्ज! खतांचा तुटवडा नाही; काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे निर्देश

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.१९ :- खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप पूर्वतयारी बैठक पार पडली. या बैठकीत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी खत व कृषी निविष्ठांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले.

बैठकीत विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांच्या खरीप नियोजनाचा सविस्तर आढावा सादर केला.

यंदा संभाजीनगर महसूल विभागात ४९.४४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी १७.११ लाख मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली असून, त्यापैकी १४.७३ लाख मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले आहे. याशिवाय रब्बी हंगामातील ७.१९ लाख मेट्रिक टन शिल्लक साठा उपलब्ध असल्याने एकूण २१.९२ लाख मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खत व बियाण्यांची कमतरता भासणार नसल्याची ग्वाही कृषी विभागाने दिली.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले की, यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे खते व बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादक, वितरक व विक्रेत्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे. साठेबाजी, लिंकिंग, वाढीव दराने विक्री किंवा कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

‘अल निनो’मुळे कमी पाऊस, पावसाचा खंड आणि पाणीटंचाईसारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर वाढवावा, शेततळ्यातील पाणी जपून वापरावे आणि दुष्काळ सहन करणाऱ्या ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, तीळ यांसारख्या पिकांची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले.

तसेच सेंद्रिय खतांचा वापर, मल्चिंग, समतोल खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

“खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; आता शेतकऱ्यांनीही योग्य नियोजन करून संकटांवर मात करण्याची वेळ आली आहे!”