कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला भावपूर्ण निरोप; डॉ. विनयकुमार राठोड यांची ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी बदली
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २६ :- छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य करणारे मा. डॉ. विनयकुमार राठोड यांचा निरोप समारंभ काल 25 मे रोजी भावनिक वातावरणात पार पडला. त्यांच्या ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर बदली झाल्याबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीस यशाच्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. राठोड यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था सक्षमपणे हाताळत जनतेचा विश्वास संपादन केला. गुन्हेगारी नियंत्रण, संवेदनशील प्रकरणांतील तत्पर कारवाई, पोलीस प्रशासनातील शिस्त आणि नागरिकांशी संवाद यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा आणि उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले.
निरोप समारंभात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना, “कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि जनतेसाठी सदैव तत्पर अधिकारी” अशी भावना व्यक्त केली. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना मिळालेल्या अनुभवांना उजाळा दिला.
यावेळी डॉ. राठोड यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील सहकाऱ्यांचे आभार मानले. “जनतेच्या सहकार्यामुळेच प्रभावीपणे काम करता आले,” असे सांगत त्यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले.
त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, ठाणे ग्रामीण जिल्ह्यातही ते आपल्या कार्याचा ठसा उमटवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
“कर्तव्य, शिस्त आणि जनसेवा यांचा आदर्श ठरलेले अधिकारी म्हणून डॉ. राठोड यांची ओळख कायम स्मरणात राहील.”