उस्मानपुरा मोरया चौक परिसरातील ४२ अनधिकृत नळ जोडण्या खंडित
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. १४ :- शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत करणाऱ्या अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली असून, मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार गुरुवारी उस्मानपुरा येथील मोरया चौक परिसरात विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत १५० मिमी उप जलवाहिनीवरील तब्बल ४२ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी १३ मे रोजी आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली होती. बैठकीत सर्व अभियंते आणि कर्मचाऱ्यांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कडक निर्देश देण्यात आले होते. तसेच मुख्य व वितरण जलवाहिन्यांवरील अनधिकृत नळ जोडण्या तात्काळ तोडण्याचे आदेशही देण्यात आले होते.
अधिकृत नळधारकांना नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा मिळावा, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे, कार्यकारी अभियंता वसंत भोये, उप अभियंता किरण धांडे, पथक अभियंता रोहित इंगळे, शाखा अभियंता मिलिंद भामरे, कनिष्ठ अभियंता विक्रांत सावंत, सुमित बोराडे यांच्यासह मनपा कर्मचारी आणि नागरी सहाय्यक पथक उपस्थित होते.
महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत नळ जोडण्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
“शहरातील पाणी चोरीवर मनपाचा बुलडोझर; अनधिकृत जोडण्यांवर कारवाई आणखी तीव्र होणार!”