अँड. अझर पठाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; आठवडी बाजार बंद होणार नाहीत, मनपाचे लेखी स्पष्टीकरण!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १० :- शहरातील हजारो पथविक्रेते, फेरीवाले आणि लघु व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरातील आठवडी बाजार बंद करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर अखेर पूर्णविराम लागला असून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने लेखी स्पष्टीकरण देत सध्या आठवडी बाजार बंद करण्याचे कोणतेही धोरण नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शहरातील सर्व आठवडी बाजार नियमितपणे सुरू असल्याचेही मनपाने नमूद केले आहे.
वेलकम शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे सचिव अँड. अझर पठाण यांनी १ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करून आठवडी बाजार बंद करण्याऐवजी त्यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी तत्कालीन आयुक्त श्रीकांत सर, नवनियुक्त आयुक्त अमोल येडगे, महापौर समीर राजूरकर तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती.
निवेदनामध्ये शहरातील पथविक्रेत्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती प्रशासनासमोर मांडण्यात आली होती. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत शहरातील तब्बल ५९ हजार १३४ पथविक्रेत्यांना ८६.८४ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह आठवडी बाजार आणि रस्त्यावरील छोट्या व्यवसायांवर अवलंबून असल्याने बाजार बंद झाल्यास बेरोजगारी आणि कर्जफेडीचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले होते.
तसेच केंद्र सरकारच्या ‘पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री नियमन) अधिनियम २०१४’ अंतर्गत पथविक्रेत्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात आले असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. संपूर्ण सर्वेक्षण, टाउन व्हेंडिंग कमिटीची प्रक्रिया आणि पर्यायी व्हेंडिंग झोन उपलब्ध करून न देता कोणत्याही पथविक्रेत्याला व्यवसायापासून वंचित करता येत नसल्याचे अँड. पठाण यांनी स्पष्ट केले होते.
यावेळी त्यांनी शहरातील वाहतूक, स्वच्छता आणि बाजार व्यवस्थापन सुधारण्यासाठी विविध उपाययोजना सुचवल्या. यामध्ये प्रत्येक प्रभागात नियोजित हॉकर्स झोनची निर्मिती, पथविक्रेत्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण, QR कोड आधारित डिजिटल ओळखपत्रे, पार्किंग व्यवस्था, मोबाईल टॉयलेट्स, स्वच्छता सुविधा, वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र आराखडा आणि पथविक्रेता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी यांचा समावेश होता.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने १० जून २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे आठवडी बाजार बंद करण्याबाबत कोणतेही धोरण नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शहरातील हजारो पथविक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचा रोजगार सुरक्षित राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
याप्रसंगी अँड. अझर पठाण यांनी मनपा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, महापौर आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच शहराच्या विकासाबरोबरच पथविक्रेत्यांच्या हक्कांचे संरक्षण करणारे स्वतंत्र आणि आधुनिक पथविक्रेता धोरण तातडीने लागू करण्याची मागणी पुन्हा केली.
"आठवडी बाजार बंद करणे हा उपाय नाही; योग्य नियोजन, कायदेशीर संरक्षण आणि आधुनिक व्यवस्थापन हाच शाश्वत मार्ग आहे. शहराचा विकास आणि पथविक्रेत्यांचा रोजगार हे दोन्ही एकत्र जपले गेले पाहिजेत," असे अँड. अझर पठाण यांनी सांगितले.
वाचत राहा महाराष्ट्र वाणी – जनतेच्या प्रश्नांना आवाज देणारे तुमचे विश्वासू व्यासपीठ!