SIR मोहिमेवर रोहित पवारांचा सवाल; ‘मतदारांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न?’

SIR मोहिमेवर रोहित पवारांचा सवाल; ‘मतदारांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न?’

महाराष्ट्र वाणी

मुंबई दि १३ :- महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकनाच्या (SIR) प्रक्रियेवर आमदार रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कोणतीही निवडणूक तातडीने होणार नसतानाही ही प्रक्रिया एवढ्या वेगाने का राबवली जात आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

SIR प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक असताना राज्यातील सुमारे १८ टक्के मतदारांची प्रपत्रे अद्याप जमा झालेली नसल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. त्यामुळे संबंधित मतदारांना पुरेसा वेळ न मिळाल्यास त्यांच्या मतदानाच्या अधिकारावर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

पश्चिम बंगालमधील SIR प्रक्रियेचा संदर्भ देत पवार यांनी महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता असल्याचा आरोप केला. या प्रक्रियेमागे राजकीय हेतू आहे का आणि सत्तेचा मार्ग अधिक सुकर करण्यासाठी मतदारांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक पात्र मतदाराला मतदानाचा अधिकार मिळणे आवश्यक असून, पुरेसा वेळ आणि संधी न देता कोणत्याही मतदाराचे नाव वगळले जाऊ नये, अशी भूमिका पवार यांनी मांडली. निवडणूक आयोगाने प्रपत्रे सादर करण्यासाठी तातडीने मुदतवाढ द्यावी, तसेच गरज पडल्यास आयोगाच्या यंत्रणेमार्फत मतदारांची पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे भेटीची वेळ मागण्यात आली आहे. मात्र, अद्याप आयोगाकडून वेळ देण्यात आलेली नसल्याचे पवार यांनी सांगितले. आयोगाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा असून, मतदारांच्या हक्कांसाठी हा मुद्दा पुढे नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, SIR प्रक्रियेमुळे पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत, यासाठी पुरेसा कालावधी आणि पारदर्शक पडताळणी प्रक्रिया आवश्यक असल्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.