जटवाडा–हर्सूल रस्त्यावरील विद्युत पोल हटणार; भूमिगत वीजवाहिनीच्या कामाचा शुभारंभ

जटवाडा–हर्सूल रस्त्यावरील विद्युत पोल हटणार; भूमिगत वीजवाहिनीच्या कामाचा शुभारंभ
जटवाडा–हर्सूल रस्त्यावरील विद्युत पोल हटणार; भूमिगत वीजवाहिनीच्या कामाचा शुभारंभ

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १३ :- मध्य विधानसभा मतदारसंघातील जटवाडा रस्ता ते हर्सूल मध्यवर्ती कारागृह आणि पुढे स्मृतीवन उद्यानापर्यंतच्या सुमारे १५ कोटी रुपयांच्या दर्जेदार रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणारे महावितरणचे विद्युत पोल हटवून वीजवाहिनी भूमिगत करण्याच्या कामाला बुधवार, १२ ऑगस्ट रोजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

रस्त्याच्या मध्यभागी किंवा कडेला असलेले विद्युत पोल वाहनचालक तसेच पादचाऱ्यांसाठी अडथळा ठरत होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास अडचणी निर्माण होण्यासोबतच अपघाताचा धोका देखील वाढला होता. हा प्रश्न लक्षात घेऊन आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या विशेष पाठपुराव्यातून भूमिगत विद्युत पुरवठ्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

या कामामुळे रस्त्यावरील विद्युत पोल टप्प्याटप्प्याने हटविण्यात येणार असून वीजपुरवठा भूमिगत वाहिनीद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्ता अधिक सुरक्षित, मोकळा आणि अडथळामुक्त होण्यास मदत होणार आहे. तसेच वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर होण्याची अपेक्षा आहे.

भूमिगत विद्युत वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या विकासाला अधिक गती मिळणार असून परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित रस्ते सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या कामाच्या शुभारंभप्रसंगी शिवसेना गटनेते किशोर नागरे, नगरसेवक राजगौरव वानखेडे, माजी नगरसेवक रुपचंद वाघमारे, विजय जगधने, बाबासाहेब जंगले, महेंद्र चव्हाण, नागेश हिवाळे यांच्यासह विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.