ब्रँडेड तेलाच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश; बीडमधील कारखान्यावर FDA ची कारवाई, १.०५ कोटींचे खाद्यतेल जप्त

महाराष्ट्र वाणी

बीड, दि. ७ :- ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत अन्न व औषध प्रशासनाने बीड एमआयडीसी परिसरातील स्वागत ऑइल इंडस्ट्रीजवर मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ५ लाख ८५ हजार २३६ रुपयांचे खाद्यतेल जप्त केले आहे. या कारवाईमुळे ब्रँडेड तेलाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांवर प्रकाश पडला आहे.

६ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या तपासणीत कारखान्यात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. वापरलेल्या डब्यांचा पुनर्वापर, एकाच टाकीतील तेलाला ‘रिफाइंड’ आणि ‘अल्ट्रा रिफाइंड’ अशी वेगवेगळी नावे देऊन विक्री, प्रयोगशाळेतील तपासणी नोंदींचा अभाव तसेच आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.

या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कारखान्यातील सुमारे ६६ हजार ६५२ किलो खाद्यतेल जप्त केले. याशिवाय, पुढील तपासणीसाठी दहा नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

प्राथमिक तपासणीनंतर संबंधित उद्योगाचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून उत्पादन युनिटलाही सील करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित संभाव्य धोका टळल्याचे मानले जात असून, खाद्यपदार्थांतील भेसळ आणि फसवणुकीविरोधातील मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे.