SIR कामातून उसंत मिळताच मनपाची कर वसुली मोहीम सुरू; एका दिवसात तब्बल 40 लाखांचा मालमत्ता कर वसूल!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३ :- एस.आय.आर. कार्यवाहीमुळे काही दिवसांपासून मागे पडलेली महानगरपालिकेची मालमत्ता कर वसुली मोहीम पुन्हा वेगाने सुरू झाली आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानंतर गुरुवारी, 3 सप्टेंबर रोजी शहरातील विविध झोन कार्यालयांनी मोठ्या थकबाकीदारांविरोधात जप्ती व मालमत्ता सील करण्याची धडक कारवाई केली.
अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपआयुक्त तथा कर निर्धारक व संकलक विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. झोन कार्यालयांच्या पथकांनी मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करून थकीत कराची वसुली केली.
झोन क्रमांक 1 मध्ये तीन मालमत्ता सील करून 2.56 लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला. झोन क्रमांक 2 मध्ये तीन मालमत्तांवर कारवाई करत 3.06 लाख रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच झोन 4 मध्ये तीन, झोन 6 मध्ये दोन, झोन 7 मध्ये एक आणि झोन 9 मध्ये एका मालमत्तेवर सीलची कारवाई करण्यात आली. या कारवाईत संबंधित झोनमधून 2.01 लाख रुपयांचा कर वसूल झाल्याची माहिती देण्यात आली.
महानगरपालिकेच्या विविध पथकांनी दिवसभर राबविलेल्या मोहिमेत जवळपास 40 लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला.
यापुढे दर गुरुवार आणि शुक्रवारी मोठ्या थकबाकीदार मालमत्ताधारकांविरोधात अशाच प्रकारे जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी थकीत मालमत्ता कर तातडीने भरून जप्ती अथवा अन्य अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी केले आहे.