स्वपक्षीय मंत्र्यांविरोधात शिवसेना आमदारांचा ‘घरचा आहेर’; जलजीवन मिशनच्या कामांवर भुमरेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ७ :- जलजीवन मिशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार विलास भुमरे यांनी केला आहे. कागदोपत्री गावांमध्ये योजना पोहोचल्याचे चित्र दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामे अपूर्ण किंवा झालेलीच नसल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणाची चौकशी आणि कारवाई करण्यासाठी आमदार भुमरे यांनी संबंधित मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वारंवार निवेदने दिल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतरही अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने अधिकाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाच्या योजनेत निधीचा योग्य वापर झाला आहे की नाही, कामांची गुणवत्ता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याची तपासणी होणे गरजेचे असल्याची भूमिका भुमरे यांनी मांडली.
आगामी अधिवेशनात हा मुद्दा ठामपणे उपस्थित करून संबंधित प्रकरणाची चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचे भुमरे यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रश्नाची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, एकाच पक्षातील आमदाराने आपल्या पक्षाच्या मंत्र्यांच्या विभागातील कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने भुमरे यांच्या या आक्रमक भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.