“शेतकऱ्यांना बियाणे-खते वेळेत द्या, लिंकींग केल्यास कठोर कारवाई!” — जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा इशारा

“शेतकऱ्यांना बियाणे-खते वेळेत द्या, लिंकींग केल्यास कठोर कारवाई!” — जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा इशारा
“शेतकऱ्यांना बियाणे-खते वेळेत द्या, लिंकींग केल्यास कठोर कारवाई!” — जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा इशारा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि. २७ :- खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांचा वेळेत व पारदर्शक पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले. तसेच खतांचे “लिंकींग” करून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांच्यासह कृषी अधिकारी, विक्रेते, वितरक आणि वाहतूकदार उपस्थित होते.

मोबाईलवरून खतांची मागणी; घरपोच पुरवठ्याचा पथदर्शी प्रकल्प

बैठकीत कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे यांनी “आयएफएमएस” या पोर्टल/ॲपद्वारे शेतकऱ्यांना मोबाईलवरून खतांची मागणी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली. या माध्यमातून घरपोच खत पुरवठ्याचा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात राबवला जाणार असून कृषी सेवा केंद्रांनी तत्काळ आपले आयडी तयार करण्याचे आवाहन करण्यात आले.

जिल्ह्यात खरीप पेरणीचे मोठे नियोजन

जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी सादरीकरणातून माहिती दिली की, जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तब्बल ६ लाख ९७ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कापूस लागवडीचे असून सुमारे ३ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस पेरणी होणार आहे.

पिकनिहाय प्रस्तावित क्षेत्र

कापूस – ३,०८,४५४ हे.

मका – २,६५,६३० हे.

तूर – ५४,८०३ हे.

सोयाबीन – ३४,२१७ हे.

मुग – १२,१६७ हे.

बाजरी – ९,०६८ हे.

भुईमूग – ८,१९९ हे.

उडीद – ३,८६६ हे.

बियाण्यांची मोठी मागणी

खरीपासाठी जिल्ह्यात एकूण ५१ हजार ७२५ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. त्यात कापसासाठी तब्बल १७ लाख १३ हजार पाकिटे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महाबीज, एनएससी आणि खासगी पुरवठादारांमार्फत पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

खतांची मागणी जवळपास ४ लाख मे.टन

खरीप २०२६ साठी जिल्ह्यात रासायनिक खतांची मागणी ३ लाख ९५ हजार ७४९ मे.टन इतकी असून त्यात युरिया, डीएपी, एनपीके, एसएसपी यांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी आतापर्यंत २ लाख ९२ हजार ७०० मे.टन खतांचे आवंटन मंजूर झाले असून आवश्यकतेनुसार पुरवठा वाढवला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

८,९९२ विक्रेत्यांवर प्रशासनाची नजर

जिल्ह्यात बियाणे, खते आणि कीटकनाशक विक्रीसाठी एकूण ८,९९२ विक्रेते कार्यरत आहेत. वितरण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकानिहाय भरारी पथके तसेच जिल्हास्तरीय निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

“शेतकऱ्यांची अडवणूक सहन केली जाणार नाही”

जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, “बियाण्यांची उगवण क्षमता तपासल्याशिवाय विक्री करू नका. खतांचा पुरवठा करताना शेतकऱ्यांच्या गरजेला प्राधान्य द्या. खतांचे लिंकींग करून अडवणूक झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

एल निनोचा संभाव्य परिणाम आणि आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यात डिझेल व पेट्रोलचा पुरवठा सुरळीत असल्याने वाहतुकीत कोणतीही अडचण येणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“खरीप हंगामाच्या तोंडावर प्रशासन सज्ज; आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा वेळेत पुरवठ्यावर!”