शासकीय कर्करोग रुग्णालयात मॅमोग्राफी यंत्राचे उद्घाटन, रुग्णांशी सौजन्यपूर्ण वागा – पालकमंत्री शिरसाट
आता कर्करोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. मुंबई किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.१२ जुलै :- कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार आणि दिलासादायक वागणूक मिळावी यासाठी रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केले.
शासकीय कर्करोग रुग्णालयातील डिजिटल मॅमोग्राफी यंत्र व स्तन कर्करोग तपासणी शिबिराच्या उद्घाटन आज पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते झाले. इतर मागास वर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषद सदस्य आ.संजय केणेकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका वर्ग व इतर तंत्रज्ञ, कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, कर्करोग रुग्णालयात नवीन उपचार पद्धतीसाठी आवश्यक मशिनरीसाठी निधीची तरतूद वेळोवेळी करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञान व उपचार पद्धतीमुळे आता कर्करोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. मुंबई किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही. छत्रपती संभाजी नगर येथील कर्करोग रुग्णालयामध्ये मराठवाड्यासह १६ जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. अशा या रुग्णांना दिलासादायक वर्तनाने सहकार्य करणे आवश्यक असते. कर्करोग रुग्णालयातील सर्व डॉक्टर, तंत्रज्ञ यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केले.
मंत्री अतुल सावे म्हणाले की, शासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या साह्याने उत्तम सेवा येथे मिळते. रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असून सर्वांनी रुग्णांना तंत्रज्ञानाच्या साह्याने उपचार करण्यामध्ये सहकार्य करावे,असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी या कार्यक्रमात केले.
याप्रसंगी कर्करोग रुग्णालयातील विविध विभागाची पाहणी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, आ. संजय केणेकर यांनी केली व तसेच रुग्णांसोबत संवाद साधला. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ .शिवाजी शुक्रे यांनी केले तर आभार विशेष कार्य अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड यांनी मानले.