मतदानाच्या दिवशी वीजपुरवठा अखंड ठेवा; तक्रार मिळताच ईव्हीएम किंवा पोलिंग पार्टी त्वरित बदला— मुख्य निवडणूक निरीक्षक अश्विन मुदगल यांचे निर्देश

मतदानाच्या दिवशी वीजपुरवठा अखंड ठेवा; तक्रार मिळताच ईव्हीएम किंवा पोलिंग पार्टी त्वरित बदला— मुख्य निवडणूक निरीक्षक अश्विन मुदगल यांचे निर्देश
मतदानाच्या दिवशी वीजपुरवठा अखंड ठेवा; तक्रार मिळताच ईव्हीएम किंवा पोलिंग पार्टी त्वरित बदला— मुख्य निवडणूक निरीक्षक अश्विन मुदगल यांचे निर्देश

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. ४ :- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी. तसेच ईव्हीएम यंत्रणा किंवा पोलिंग पार्टीबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास ती तात्काळ सोडवून संबंधित ईव्हीएम किंवा मनुष्यबळ त्वरित बदलण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. अश्विन मुदगल यांनी आज दिले.

मा. राज्य निवडणूक आयोगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी श्री. अश्विन मुदगल यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या निमित्ताने आज त्यांनी महानगरपालिकेतील मतदानाची पूर्वतयारी, निवडणूक यंत्रणा तसेच प्रशासकीय समन्वयाचा सखोल आढावा घेतला.

या आढावा बैठकीस छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्री. जी. श्रीकांत, पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक श्री. विनयकुमार राठोड, अतिरिक्त आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे, श्री. रणजीत पाटील यांच्यासह महापालिकेतील सर्व उप आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. मुदगल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मतदानाच्या दिवशी वीजपुरवठा खंडित झाल्यास मतदान प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वीज वितरणाशी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा. तसेच मतदानाच्या दिवशी ईव्हीएम यंत्रणा खराब होणे, मतदान अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांच्या संथगती मुळे मतदारांची रांगा लांब होत चालली आहे, अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्या त्वरित सोडवून पर्यायी ईव्हीएम किंवा मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

तसेच संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, उपलब्ध मूलभूत सुविधा, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच मतदार जनजागृतीबाबतही त्यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांनी मतदान तयारीसंदर्भातील सर्व बाबींची तपशीलवार माहिती मुख्य निवडणूक निरीक्षकांना सादर केली.

पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार यांनी माहिती देताना सांगितले की, यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुका शहरात शांततेत पार पडल्या असून, महानगरपालिका निवडणुकीसाठीही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार असून, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उपलब्ध ड्रोनद्वारे निरीक्षणासोबतच आवश्यक त्या ठिकाणी घोषणा (अनाऊन्समेंट) करणेही शक्य होणार आहे. याशिवाय आजपासून पोलीस दलाच्या रूट मार्चलाही सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया निर्भीड, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. अश्विन मुदगल यांनी केले.