'रमाई घरकुल' योजनेत तब्बल १०० कोटींचा गैरव्यवहार? इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप; दोन माजी नगरसेवकांचाही उल्लेख!

'रमाई घरकुल' योजनेत तब्बल १०० कोटींचा गैरव्यवहार? इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप; दोन माजी नगरसेवकांचाही उल्लेख!

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १ जुलै :– छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या ‘रमाई घरकुल’ योजनेत प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना थेट दावा केला की, दलाल, मनपातील अधिकारी आणि काही नेत्यांच्या संगनमताने या योजनेत तब्बल १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

जलील म्हणाले की, "ज्यांच्या नावाने ही योजना राबवली जाते, त्या रमाई आंबेडकर यांच्या नावालाही या घोटाळेबाजांनी काळिमा फासला आहे. विशेष म्हणजे, ही योजना ज्या समाजासाठी आहे, त्याच समाजातील काही नेत्यांनीच गैरप्रकार घडवले."

मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणाचे धक्कादायक तपशील उघड केले. जलील यांनी सांगितले की, ५०० लाभार्थी आणि प्रत्येकी अडीच लाखांच्या हिशेबाने आकडेमोड केली, तर हा घोटाळा किती मोठा आहे हे स्पष्ट होते.

या योजनेसाठी मनपाने एका संस्थेला २५ लाखांच्या निविदेच्या आधारे काम दिले आहे. संबंधित संस्था एखाद्या मोठ्या नेत्याची असल्याचे सांगत, जलील यांनी तूर्त त्याचे नाव जाहीर केले नाही. मात्र, या संस्थेशी संबंधित दोन माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अवघ्या १० टक्के खर्चात घरकुल बांधण्याचे उदाहरण जगात कुठेच सापडणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

योजनेत बनावट लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून, एकाच कुटुंबातील चार जणांनाही लाभ मिळाला आहे. शिवाय, शहराबाहेरील नागरिकांच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करूनही लाभ मिळवला गेला, असा आरोपही त्यांनी केला.

या प्रकरणाचे सर्व पुरावे सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुख्यमंत्री कार्यालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आले असून, लवकरच माध्यमांसमोरही ते सादर करण्यात येतील, असे जलील यांनी सांगितले.

 या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होईल का? ‘महाराष्ट्र वाणी’ आपल्या उत्तरांची

वाट पाहत आहे!