“29 प्रभागांत काँग्रेसचा एकच नगरसेवक; राष्ट्रवादीला ओबेरॉयचा आधार”!“एमआयएमची लाट, काँग्रेस-राष्ट्रवादीची वाताहत; पराभवाची जबाबदारी कोणाची?”

“29 प्रभागांत काँग्रेसचा एकच नगरसेवक; राष्ट्रवादीला ओबेरॉयचा आधार”!“एमआयएमची लाट, काँग्रेस-राष्ट्रवादीची वाताहत; पराभवाची जबाबदारी कोणाची?”

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 16 :

महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेसला जबर धक्का बसला असून, मुस्लिम बहुल प्रभागांत एमआयएमच्या जोरदार लाटेत दोन्ही पक्ष अक्षरशः वाहून गेल्याचे चित्र दिसून आले आहे. “वोटबँक नेमकी कुठे गेली?” आणि “या पराभवाची जबाबदारी कोण घेणार?” असे सवाल आता कार्यकर्त्यांतून दबक्या आवाजात उपस्थित होत आहेत.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने एकूण 95 उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र प्रचाराच्या मैदानातच पक्षांतर्गत विस्कळीतपणा स्पष्टपणे जाणवला. दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष प्रचारात सक्रिय नसल्याची चर्चा शहरभर रंगली.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला आणि त्यांची पत्नी प्रभाग क्रमांक 28 मधून उमेदवार होते, मात्र दोघांनाही दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख यांनी आपल्या चिरंजीव सलिम शेख यांच्या प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवारीवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने इतर उमेदवारांकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. परिणामी सलिम शेख यांनाही पराभव पत्करावा लागला आणि ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

या अपयशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडे केवळ एकच नगरसेवक निवडून आला आहे. प्रभाग क्रमांक 14 मधून मलेका हबीब कुरैशी यांनी स्वतःच्या ताकदीवर विजय मिळवत पक्षाची नामुष्की टाळली. 29 प्रभागांतून 115 जागांपैकी काँग्रेसला एकमेव यश मिळाले आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी मात्र प्रभाग क्रमांक 19 मधून सतिंदरसिंग उर्फ नवीन मनमोहनसिंग ओबेरॉय आशेचा किरण ठरले. त्यांनी भाजपाचे संजय रामदास जोशी यांचा तब्बल 6,725 मतांनी पराभव करत राष्ट्रवादीची लाज राखली.

एकूणच या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था चिंताजनक ठरली असून, पराभवाची जबाबदारी कोण स्वीकारणार? शहराध्यक्ष बदलले जाणार का? असे प्रश्न आता पक्षांतर्गत चर्चेचा विषय बनले आहेत.

— पुढे काय? काँग्रेस-राष्ट्रवादी आत्मपरीक्षण करणार की नेतृत्व बदलाचा निर्णय घेणार?