मृत्यूच्या विहिरीत उडी घेऊन ५ जणांना जीवदान; इरफान मुजावर ठरले ‘देवदूत’
महाराष्ट्र वाणी
सातारा (प्रतिनिधी) दि १५ :- सातारा–सोलापूर महामार्गावरील तांदूळवाडी परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांनी भरलेला पिकअप टेम्पो रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने एकाच गावातील ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ महिलांसह अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे.
म्हसवडहून परतताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडला. मात्र या काळ्याकुट्ट क्षणी माणुसकीचा उज्ज्वल चेहरा म्हणून इरफान मुजावर पुढे आले.
अपघातावेळी इरफान मुजावर हे दुचाकीवरून टेम्पोच्या मागे येत होते. त्यांच्या डोळ्यांसमोर टेम्पो विहिरीत कोसळला. त्यांनी तत्काळ गावकऱ्यांना माहिती देऊन मदतीसाठी धाव घेण्याचे आवाहन केले. दरम्यान, विहिरीत एक लहान मूल बुडताना दिसताच इरफान यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट पाण्यात उडी घेतली.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी त्या चिमुकल्याला बाहेर काढले, त्याच्या पोटातील पाणी काढून त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने आणखी दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुष अशा पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले. इतर दोन जणांनी स्वतःच्या प्रयत्नाने विहिरीबाहेर येत जीव वाचवला.
मात्र टेम्पो विहिरीत पालथा पडल्याने आत अडकलेल्या ८ जणांपर्यंत वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची खंत इरफान यांनी व्यक्त केली आहे.
या दुर्घटनेत अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी इरफान मुजावर यांच्या धाडसाने आणि माणुसकीने समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. धर्म, जात किंवा पंथ यापलीकडे जाऊन संकटात धावून जाणारी माणसेच समाजाचे खरे बळ असतात, हे इरफान यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या शौर्याला सलाम करत आहे. कारण संकटाच्या क्षणी ओळख धर्माची नसते, तर माणुसकीची असते.
— मृत्यूच्या सावटातही माणुसकीचा हात पुढे करणाऱ्या अशा देवदूतांमुळेच समाजातील विश्वास आणि एकोप्याची ज्योत कायम तेवत राहते.