महामार्गालगतच्या व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत; जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांचे आवाहन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ७ :- जिल्ह्यात महामार्गालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ अर्थात धुळे–सोलापूर महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ अर्थात छत्रपती संभाजीनगर–पैठण मार्गालगतची व्यावसायिक अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शनिवारपासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत महामार्गालगत असलेली सुमारे ४७० पक्की दुकाने व ढाबे, तसेच २५५ कच्ची शेड, टपऱ्या आणि विविध व्यावसायिक फलक व साहित्य हटविण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अतिक्रमण हटविण्यापूर्वी आवश्यक ती विहित प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जात आहे.
सोमवारी धुळे–सोलापूर महामार्गावरील गांधेली, सातारा, कांचनवाडी आणि नक्षत्रवाडी परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. ही कारवाई पुढील सुमारे १५ दिवस सुरू राहणार असून कन्नड आणि पैठण परिसरापर्यंत मोहिमेचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण विभागाने दिली.
दरम्यान, नागरिक आणि व्यावसायिकांनी प्रशासनाच्या कारवाईची वाट न पाहता महामार्गालगत केलेली अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि अपघातांचा धोका कमी करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.