“मंडपात जाण्याआधी वराने हाती घेतली कुदळ; लग्नाची सुरुवात वृक्षारोपणाने!”
महाराष्ट्र वाणी
पैठण दि २१ :- लग्नसमारंभ म्हटले की मोठा खर्च, रोषणाई आणि विविध प्रकारचे आयोजन पाहायला मिळते. मात्र, पैठण तालुक्यातील शेवता येथील सरपंच अक्षय देशमुख यांनी आपल्या विवाहाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक उपक्रम राबवत एक वेगळा आदर्श निर्माण केला. विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला.
विवाहाच्या आनंदाच्या क्षणी वराने स्वतः कुदळ हातात घेत रोपाची लागवड केली. या उपक्रमातून केवळ एक झाड लावण्यात आले नाही, तर पुढील पिढ्यांसाठी हिरवाई, स्वच्छ हवा आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
आज विवाह आणि इतर शुभकार्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च केला जात असताना, अक्षय देशमुख यांच्या या उपक्रमाने साधेपणा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श समोर ठेवला आहे. ‘हिरवाईतून समृद्धीकडे’ या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस निसर्गाच्या सान्निध्यात संस्मरणीय केला.
या ‘ग्रीन वेडिंग’ उपक्रमाचे आयोजन पन्नालाल ग्रीन ग्रुप आणि Read & Lead Foundation यांच्या सहकार्याने करण्यात आले. विवाहाच्या शुभमुहूर्तावर वृक्षारोपण करण्याच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, इतरांनीही आपल्या आयुष्यातील शुभप्रसंगी वृक्षारोपण करण्याचा आदर्श घ्यावा, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
सरपंच अक्षय देशमुख आणि नवदांपत्याच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.