"बैल गेला, पत्नीला जुंपावं लागलं जोखड; व्हिडिओ पाहताच मुख्यमंत्री धावले मदतीला!" लातूरच्या भूमिहीन शेतकरी कुटुंबाला काही तासांत नवा बैल व नुकसानभरपाई;
महाराष्ट्र वाणी
मुंबई (प्रतिनिधी) दि १० :- वीज पडून बैल दगावल्याने नांगराच्या जोखडाला स्वतःच्या पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या कुटुंबाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा हृदयद्रावक व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने प्रशासनाला मदतीचे निर्देश दिले. अवघ्या काही तासांत गायकवाड कुटुंबाला नवा बैल उपलब्ध करून देण्यात आला, तसेच दगावलेल्या बैलाच्या नुकसानभरपाईची रक्कमही मंजूर करण्यात आली.
देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील काशिनाथ गायकवाड हे भूमिहीन शेतकरी असून बैलजोडीच्या मदतीने ते व त्यांची पत्नी हौसाबाई इतरांच्या शेतात मशागत, नांगरणी, पेरणी आणि वखरणीची कामे करून उदरनिर्वाह करतात. मात्र, ५ जून रोजी झालेल्या वादळी पावसात वीज पडून त्यांच्या एका बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळे सुरू असलेली शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी हौसाबाईंनाच बैलाच्या जागी जोखडाला जुंपावे लागले.
ही घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने दखल घेत मुख्यमंत्री सचिवालयामार्फत लातूर जिल्हा प्रशासनाला मदतीचे आदेश दिले. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पशुसंवर्धन आणि कृषी विभागाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. पशुसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक नवा बैल उपलब्ध करून तो थेट गायकवाड कुटुंबाच्या स्वाधीन केला.
नवा बैल मिळाल्यानंतर हौसाबाई गायकवाड यांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. "आमच्यावर मोठे संकट आले होते. पण आमच्या अडचणीची तात्काळ दखल घेत मदत मिळाल्याने खरीप हंगामाची चिंता दूर झाली," असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून आर्थिक मदत दिली जाते. गायकवाड यांच्या दगावलेल्या बैलाचा पंचनामा व शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून नियमानुसार नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असून ती थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
वाचकांसाठी प्रश्न: एका व्हायरल व्हिडिओने शेतकरी कुटुंबाचे आयुष्य बदलले; अशा गरजूंपर्यंत मदतीचा हात वेळेत पोहोचण्यासाठी प्रशासनाने आणखी कोणती पावले उचलायला हवीत?