नांदेडच्या सायमा निकहत यांचा इतिहास; उर्दू माध्यमातून शिकून पहिल्याच प्रयत्नात बनल्या न्यायाधीश
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- महाराष्ट्रातील नांदेड येथील सायमा निकहत यांनी ज्यूडिशियल मजिस्ट्रेट फर्स्ट क्लास (JMFC) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. उर्दू माध्यमातून शिक्षण घेतलेल्या सायमा यांनी न्यायव्यवस्थेतील या प्रतिष्ठेच्या परीक्षेत यश संपादन करून अनेक विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
सायमा निकहत यांचे प्राथमिक तसेच शालेय शिक्षण उर्दू माध्यमातून झाले. मर्यादित साधनसामग्री आणि मोठ्या कोचिंग संस्थांचा आधार नसतानाही त्यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केली.
त्यांच्या यशामुळे केवळ इंग्रजी माध्यमातील किंवा नामांकित शाळांतील विद्यार्थीच स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतात, हा समज खोटा ठरल्याची चर्चा होत आहे. शिक्षणाचे माध्यम नव्हे, तर मेहनत, चिकाटी आणि योग्य तयारीच यशाचे खरे सूत्र असल्याचा संदेश त्यांच्या यशातून मिळतो.
सायमा निकहत यांच्या या यशाचे सोशल मीडियासह विविध स्तरांतून कौतुक होत असून, स्वतःची ओळख जपत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी गाठलेले हे यश अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.