फुलंब्री पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २७ गोवंश जनावरांची सुटका, ₹३१.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
टाटा कंटेनरसह दोन आरोपी ताब्यात; जनावरांना अमानुष पद्धतीने कोंबून वाहतूक केल्याचा आरोप
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २२ :- ग्रामीण पोलिसांनी गोवंश जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या नेण्यात येणाऱ्या २७ गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत १८ लाख रुपये किमतीचा टाटा कंटेनर ट्रक आणि १३.५० लाख रुपये किमतीची जनावरे असा एकूण ३१.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक, प्राण्यांवरील क्रूरता आणि अवैध कत्तलीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. त्याच मोहिमेअंतर्गत फुलंब्री पोलिसांनी ही कारवाई केली.
२१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चौका बसस्टँड परिसरात संशयास्पद टाटा कंटेनरची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये २७ बैलांना अत्यंत दाटीवाटीने कोंबून, दोऱ्यांनी घट्ट बांधून अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. जनावरांना हालचालीसाठी जागा नसल्याने त्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी इरफान शेख मेहमूद (वय ३७, रा. ईदगाह नगर, ता. सिल्लोड) आणि असलम सुपडू कुरेशी (वय २२, रा. ईदगाह नगर, ता. सिल्लोड) यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सुटका करण्यात आलेल्या सर्व २७ गोवंश जनावरांना 'मातोश्री प्रयागबाई जाधव गौशाळा, पाल' येथे सुरक्षितपणे दाखल करण्यात आले असून, त्यांच्या वैद्यकीय तपासणीसह देखभालीची व्यवस्था करण्यात आली आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेश दवंगे तसेच फुलंब्री पोलिसांच्या पथकाने केली.
जप्त मुद्देमाल :
२७ गोवंश जनावरे (बैल) – ₹१३.५० लाख
टाटा कंटेनर ट्रक – ₹१८ लाख
एकूण जप्त मुद्देमाल – ₹३१.५० लाख