स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त शहरात २२ ते २८ जुलै 'जनसेवा सप्ताह'; रक्तदान, वृक्षारोपण ते खो-खो स्पर्धेपर्यंत विविध उपक्रम

स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त शहरात २२ ते २८ जुलै 'जनसेवा सप्ताह'; रक्तदान, वृक्षारोपण ते खो-खो स्पर्धेपर्यंत विविध उपक्रम
स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त शहरात २२ ते २८ जुलै 'जनसेवा सप्ताह'; रक्तदान, वृक्षारोपण ते खो-खो स्पर्धेपर्यंत विविध उपक्रम

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १९ :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत जिल्हाभर 'जनसेवा सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, नेत्रतपासणी, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, कीर्तन, फराळ वाटप तसेच जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचा या सप्ताहात समावेश असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतीश चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस दिलीप बनकर, शहराध्यक्ष अभिजित देशमुख आणि महेश उबाळे यांची उपस्थिती होती.

आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, दरवर्षी २२ जुलै हा दिवस स्व. अजितदादा पवार यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जात होता. मात्र, त्यांच्या अकाली निधनानंतर यंदा प्रथमच त्यांची जयंती साजरी केली जाणार आहे. त्यांच्या समाजाभिमुख कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि सेवाभावी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आठवडाभर विविध लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

'जनसेवा सप्ताह'चे नियोजित कार्यक्रम

२२ जुलै : देवगिरी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर; सुमारे ३ हजार रक्तदात्यांचे लक्ष्य.

२३ जुलै : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत वृक्षारोपण मोहीम.

२४ जुलै : सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींना 'लोकनेते अजितदादा पवार सन्मान' पुरस्कार प्रदान. सकाळी ११.३० वाजता देवगिरी महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध वक्ते व संपादक संजय आवटे यांची प्रमुख उपस्थिती.

२५ जुलै : आषाढी एकादशीनिमित्त वाळूज–पंढरपूर मार्गावरील वारकऱ्यांना फराळ वाटप.

२६ जुलै : गंगापूर येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात ह.भ.प. अविनाश महाराज भारती यांचे कीर्तन.

२७ जुलै : गंगापूर व कन्नड येथे मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिर.

२८ जुलै : देवगिरी महाविद्यालयात जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा. मुलांच्या व मुलींच्या विजेत्या संघांना प्रत्येकी ११ हजार रुपये, उपविजेत्या संघांना प्रत्येकी ७ हजार रुपये आणि चषक प्रदान करण्यात येणार आहेत.