महायुतीत अध्यक्षपदावरून चुरस; 'बॅलेन्सिंग' भूमिकेचा दानवेंचा इशारा चर्चेत
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १५ :- औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महायुतीने २० पैकी १९ जागांवर विजय मिळवत बँकेवरील सत्ता कायम राखली आहे. मात्र आता अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वीच महायुतीतील अंतर्गत राजकारणाला वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषद माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलकडून विजयी झालेल्या दानवे यांनी अध्यक्षपदाच्या निवडीत "माझी भूमिका बॅलेन्सिंग असेल" असे स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीतील विविध गटांच्या राजकीय गणितांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावेळी झालेल्या निवडणुकीत आठ संचालक बिनविरोध निवडून आले, तर उर्वरित १२ जागांसाठी मतदान झाले. महायुतीला १९ जागा मिळाल्या असून काँग्रेस समर्थित पॅनेलला केवळ एक जागा मिळाली. त्यामुळे अध्यक्षपद महायुतीकडेच जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
संचालकांच्या संख्येनुसार शिवसेनेकडे ९, भाजपाकडे ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे २ संचालक आहेत. त्यामुळे अध्यक्षपदावर शिवसेनेचा सर्वाधिक दावा मानला जात आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पातळीवर होण्याची शक्यता असून २० जुलै रोजी अध्यक्षपदाची निवड होणार आहे.
दरम्यान, अध्यक्षपदासाठी शिवसेनेतच स्पर्धा वाढल्याचे चित्र आहे. आमदार अब्दुल सत्तार आपल्या पुत्र समीर सत्तार यांच्या नावासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे खासदार संदीपान भुमरे यांच्याकडून आमदार विलास भुमरे यांच्या नावाला पाठबळ दिले जात असल्याचे बोलले जात आहे. मंत्री अतुल सावे यांच्याही हालचालींवर राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
अशा परिस्थितीत अंबादास दानवे यांचे सत्तार, भुमरे, सावे आणि संजय शिरसाट यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे त्यांच्या "बॅलेन्सिंग" भूमिकेचा अध्यक्षपदाच्या समीकरणांवर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दानवे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद शेतकरी प्रवर्गातील संचालकाकडे जावे, अशी इच्छा व्यक्त केली असून २० जुलैपर्यंत आणखी राजकीय घडामोडी घडण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी महायुतीतील राजकीय हालचाली आणखी वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.