जागतिक रक्तदाता दिनी रक्तदानाचा महायज्ञ; गुणवंत विद्यार्थ्यांचाही झाला गौरव
सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम; समाजसेवक सुमित पंडित यांचे ५९ वे रक्तदान
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १४ :- जागतिक रक्तदाता दिन आणि समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त जटवाडा रोड येथील माणुसकी सलूनमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित या उपक्रमात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. तसेच दहावी-बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना गजानन पिंजरकर यांनी रक्तदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असल्याचे सांगत समाजहितासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
विशेष म्हणजे समाजसेवक सुमित पंडित यांनी स्वतःचे ५९ वे रक्तदान करून युवकांसमोर आदर्श निर्माण केला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास एक महिना २१ दिवस मोफत सलून सेवा देण्याची घोषणाही करण्यात आली.
रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला.
वाचत रहा ‘महाराष्ट्र वाणी’ – आपल्या परिसरातील प्रत्येक सकारात्मक घडामोडींची विश्वासार्ह माहिती!