सिल्लोड–सोयगावच्या शेतकऱ्यांसाठी अब्दुल सत्तारांची मोठी बैठक! कृषीमंत्र्यांकडून तातडीचे आदेश
महाराष्ट्र वाणी
मुंबई दि १५ :- सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील कृषी विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मुंबईतील मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
बैठकीत लिहाखेडी येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी, ₹१९० लाखांचा आकस्मिक निधी, पदनिर्मिती, संरक्षक भिंत, फर्निचर आणि अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे कृषी विद्यापीठाचे उपसंकुल, जैविक औषधे प्रयोगशाळा आणि मका संशोधन केंद्रासाठी आवश्यक निधी व पदनिर्मितीबाबतही चर्चा झाली.
याशिवाय पोखरा टप्पा-२ मध्ये मतदारसंघातील उर्वरित गावांचा समावेश, सिल्लोड कृषी भवन व मल्टीपर्पज हॉलसाठी निधी, बोगस बियाणे, खते व कीटकनाशकांवर कठोर कारवाई, खतांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज, २०२५ खरीप हंगामातील प्रलंबित पीक विमा, पीक विम्याचा प्रीमियम पुन्हा ₹१ करणे आणि पूर्वीचा जोखीमस्तर लागू करण्याची मागणी आमदार सत्तार यांनी केली.
पावसातील खंडामुळे दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना बियाणे व आर्थिक मदत, नॅनो युरिया अनुदानित दरात उपलब्ध करून देणे तसेच कृषी सेवा केंद्र चालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
बैठकीतील मागण्यांवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली.