गोवा बनावटीच्या दारूचा मोठा भांडाफोड! सिल्लोड उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; ११.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक फरार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २३ :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सिल्लोड ई विभागाने गोवा राज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या मद्याविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ११ लाख ८१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन चारचाकी वाहने, गोव्यात विक्रीस असलेल्या ३९६ विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरले जाणारे हजारो प्लास्टिक बुचे जप्त करण्यात आले.
गुप्त माहितीच्या आधारे फुलंब्री-निधोना रोड तसेच फुलंब्री-नाचनवेल रोड परिसरात टाकलेल्या सापळ्यात दोन स्वतंत्र गुन्हे (क्र. १६६/२०२६ व १६७/२०२६) दाखल करण्यात आले. या कारवाईत सोमनाथ भागीनाथ जगताप, सत्तार अहमद शेख (बागवान) आणि विकास प्रभाकर गोराडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून जब्बार सत्तार बागवान हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
कारवाईदरम्यान रेनॉल्ट क्विड व मारुती सुझुकी इर्टिगा ही दोन वाहने, रॉयल इम्पॅक्ट ग्रेन व्हिस्कीच्या ३९६ बाटल्या, देशी दारूच्या भिंगरी संत्रा ब्रँडचे १५ हजार बुचे आणि विदेशी मद्याचे १,१६० बनावट प्लास्टिक बुचे जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात गोवा राज्यातून मद्य आणून महाराष्ट्राचा महसूल बुडवत बनावट मद्यनिर्मितीचा प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अधीक्षक अभिनव बालुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एन. आर. मुंजाळ व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.
📞 नागरिकांना आवाहन :
अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.