परवाना नसल्यास व्यवसाय बेकायदेशीर ठरेल – मनपाचा इशारा

शहरासाठी, कायद्याच्या चौकटीत!वेळेत परवाना घ्या, मनपा कारवाईपासून वाचा!

परवाना नसल्यास व्यवसाय बेकायदेशीर ठरेल – मनपाचा इशारा
परवाना नसल्यास व्यवसाय बेकायदेशीर ठरेल – मनपाचा इशारा

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि. ०३ जुलै :- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार आता शहरातील सर्व दुकानदार व व्यावसायिकांसाठी दुकान/व्यवसाय परवाना अनिवार्य करण्यात आला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ३१३, ३७६, ३७७, ३७८ व ३८६ अंतर्गत हे आदेश लागू झाले असून, मनपा हद्दीत कोणतीही आस्थापना परवान्याशिवाय चालवणे कायदेशीर गुन्हा ठरेल.

कोणासाठी आहे परवाना आवश्यक?

शहरातील कोणतेही दुकान, उद्योग, कार्यालय, सेवा केंद्र, फेरीवाले इत्यादी व्यवसाय हे कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी व सार्वजनिक आरोग्य, अग्निसुरक्षा, पर्यावरण, नागरी सुविधा यांची अंमलबजावणी सुयोग्यरित्या करण्यासाठी परवाना आवश्यक आहे.

परवाना मिळविण्याची पद्धत

संबंधित व्यावसायिकांनी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित प्रभाग कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. परवाना शुल्क ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष पद्धतीने भरता येणार आहे.

विलंब केल्यास होणार दंड

निर्धारित मुदतीत परवाना शुल्क भरले नाही तर विलंब शुल्क आकारण्यात येईल. वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई होणार असून, अशा व्यवसायांची स्थापना सील देखील केली जाऊ शकते.

मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर परवाना अर्ज, शुल्क तपशील, आवश्यक कागदपत्रांची यादी व इतर सर्व माहिती उपलब्ध आहे. नागरिकांनी कायदेशीर प्रक्रियेला पाठबळ देत शहराच्या सुव्यवस्थेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.