“तुमचा कॅमेरा, शहराची सुरक्षा” – पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचे नागरिकांना आवाहन

“तुमचा कॅमेरा, शहराची सुरक्षा” – पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचे नागरिकांना आवाहन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २६ :- शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने “एक कॅमेरा शहरासाठी सर्वांच्या सुरक्षेसाठी” ही महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरातील नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे.

या मोहिमेत शहरातील नागरिक, व्यावसायिक, शाळा-महाविद्यालये, शासकीय व खाजगी संस्था, तसेच स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहराच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, गुन्हे प्रतिबंध व तपास प्रक्रियेत त्यांचा मोठा उपयोग होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी आपल्या घर, दुकान, सोसायटी, हॉटेल किंवा कार्यालयांमध्ये बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यांपैकी किमान एक कॅमेरा सार्वजनिक रस्त्याकडे वळवावा, असे सांगण्यात आले आहे. ज्या ठिकाणी कॅमेरे नाहीत, तिथे नवीन CCTV बसवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

तसेच कॅमेरे २४ तास कार्यरत राहतील, योग्य दिशेत असतील आणि रात्रीच्या वेळीही स्पष्ट चित्र मिळेल यासाठी आवश्यक व्यवस्था ठेवावी, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे. गरज भासल्यास पोलिस तपासासाठी फुटेज उपलब्ध करून देणेही आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे, गुन्ह्यांची उकल जलद करणे आणि शहर अधिक सुरक्षित बनवणे शक्य होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. तसेच नागरिकांनी आपल्या CCTV कॅमेऱ्यांची जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदणी करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

👉 “तुमचा एक कॅमेरा… शहराच्या सुरक्षेसाठी मोठा आधार ठरू शकतो!”