“टक्केवारीची वाट बघत आहेत का?” MIDC नियुक्तीवर सुनील गव्हाणेंचा घणाघात
महाराष्ट्र वाणी
मुंबई दि २१ :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) सरळसेवा भरती 2023 अंतर्गत सहाय्यक आरेखक (Assistant Draftsman) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. भरती प्रक्रियेला जवळपास तीन वर्षे उलटूनही निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
13 ऑगस्ट 2023 रोजी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर 10 ऑगस्ट 2025 रोजी परीक्षा झाली. 8 ऑक्टोबर 2025 रोजी गुणवत्ता यादी, 10 फेब्रुवारी 2026 रोजी निवड यादी जाहीर करण्यात आली, तर 6 मे 2026 रोजी कागदपत्र पडताळणीची प्रक्रियाही पूर्ण झाली. मात्र, त्यानंतरही उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत.
एकीकडे राज्य सरकार आणि उद्योग विभागाकडून रोजगारनिर्मितीच्या घोषणा केल्या जात असताना, दुसरीकडे भरती प्रक्रियेत निवड झालेल्या तरुणांना नियुक्ती आदेशासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश समन्वयक सुनिल गव्हाणे यांनी केला आहे.
“नियुक्तीला एवढा विलंब का?”
सुनिल गव्हाणे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “उमेदवारांनी परीक्षा दिली, गुणवत्ता यादीत स्थान मिळवले, निवड झाली आणि कागदपत्र पडताळणीही पूर्ण झाली. मग नियुक्ती आदेशासाठी एवढा विलंब का?” असा सवाल केला.
तसेच, “सरकारमधील अधिकारी व पुढारी टक्केवारीची वाट बघत आहेत का? युवकांच्या रोजगारापेक्षा टक्केवारी, गुंडगिरी आणि भ्रष्टाचारालाच प्राधान्य दिले जात आहे का?” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
निवड झालेल्या सर्व उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश द्यावेत आणि नियुक्तीला झालेल्या विलंबाचे कारण सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी गव्हाणे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.