छत्रपती संभाजीनगरात नशेच्या गोळ्यांचा काळाबाजार उघड! ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघे रंगेहात, महिलेसह तिघांवर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २५ :- शहरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांच्या विक्रीविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने कारवाई केली आहे. जालना रोडवरून महेशनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बाफना ज्वेलर्सच्या मोकळ्या प्लॉटजवळ केलेल्या या कारवाईत नशेच्या १६५ औषधी गोळ्यांसह एकूण ८६ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांनी एका महिलेकडून या गोळ्या आणल्याचे सांगितल्याने महिलेसह तिघांविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहितीवरून पोलिसांची कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाला नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे आणि त्यांच्या पथकाने जालना रोड ते महेशनगर मार्गावरील बाफना ज्वेलर्सच्या मोकळ्या प्लॉटजवळ कारवाई केली.
या कारवाईदरम्यान अजय भाऊसाहेब गात (वय २७, व्यवसाय इलेक्ट्रिशियन, रा. गल्ली क्रमांक ३०, बायजीपुरा) आणि श्रीकांत रामेश्वर शेजुळ (वय २०, व्यवसाय खासगी नोकरी, रा. गल्ली क्रमांक ३०, हनुमान मंदिराजवळ, बायजीपुरा) हे दोघे नशेच्या औषधी गोळ्या विक्रीसाठी बाळगल्याच्या संशयावरून आढळून आले.
१६५ गोळ्या, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त
पोलिसांनी दोघांकडून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या १६५ औषधी गोळ्या, एक मोबाईल हँडसेट, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण ८६ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
चौकशीदरम्यान या गोळ्या नयना शेख ऊर्फ बाजी (रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) या महिलेकडून आणल्याचे दोघांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर या प्रकरणात संबंधित महिलेसह तिघांविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) पूनम पाटील आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या पथकात सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, पोलीस हवालदार नारायण पायघन, भावसिंग चव्हाण, पोलीस अंमलदार सतीश जाधव, महिला पोलीस अंमलदार छाया लांडगे, देशराज मोरे, सरताज पठाण, विशाल मेटे आणि चालक पोलीस अंमलदार विठ्ठल पवार यांचा सहभाग होता.
नशेखोरीविरोधात माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचे, नशा करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे किंवा नशेखोरी करणाऱ्या टोळ्या आढळून आल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने केले आहे.
यासाठी मोबाईल क्रमांक ९६८४७०२००२ या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून माहिती देता येणार आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित