एसटीच्या प्रसाधनगृहांत घाण आढळली तर विभाग नियंत्रकांवर कारवाईचा बडगा! प्रताप सरनाईकांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा
स्वच्छतेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; दोन रुपये स्वच्छता अधिभार घेता, मग प्रवाशांना स्वच्छताही द्या!
मुंबई दि. २२ :- एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांमध्ये अस्वच्छता आढळल्यास संबंधित विभाग नियंत्रकांना थेट जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट आणि कठोर इशारा राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. प्रवाशांकडून दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारला जात असताना त्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित स्वच्छता आढावा बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते.
दोन रुपये स्वच्छता अधिभार घेता, मग स्वच्छता राखाच!
बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता ही केवळ औपचारिकता नसून प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची बाब आहे. सर्वसामान्य प्रवाशांकडून दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारला जातो. प्रवासीही ही रक्कम देतात; मात्र त्याबदल्यात त्यांना किमान स्वच्छतेच्या सुविधा मिळणे अपेक्षित आहे. प्रवाशांच्या या रास्त अपेक्षा पूर्ण करणे हे एसटी महामंडळाचे कर्तव्य असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ असल्यास त्याचा परिणाम महामंडळाच्या प्रतिमेवर होतो. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही कुचराई होता कामा नये, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही!
बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करावी, स्वच्छतेबाबत सातत्याने दक्ष राहावे आणि संबंधित कंत्राटदारांकडून करारानुसार स्वच्छता करून घ्यावी, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले. मात्र, स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी कंत्राटदारांवर टाकून अधिकाऱ्यांना हात झटकता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपापल्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतेवर संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवावे. प्रवाशांना स्वच्छ सुविधा देण्यात प्रशासन कमी पडल्यास संबंधित विभाग नियंत्रकांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रवाशांना स्वच्छ सुविधा देणे ही एसटीची जबाबदारी
एसटी महामंडळ हे सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासासोबतच स्वच्छ बसस्थानके, स्वच्छ प्रसाधनगृहे आणि आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली.
आता एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रत्यक्षात किती बसस्थानकांवर या निर्देशांची अंमलबजावणी होते आणि अस्वच्छता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित