कसबखेडा फाट्याजवळ डांबराच्या ट्रकला आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- गंगापूर तालुक्यातील कसबखेडा फाटा येथे डांबराच्या ट्रकला आग लागल्याची घटना सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आगीवर नियंत्रण मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाली. त्यानंतर पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी पोहोचले. गट क्रमांक ५८, पाचपीरवाडी परिसरातील डी-कंटेनरमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी ११० बॅरल आणि २०० किलो फोमचा वापर करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्र अधिकारी व्ही. के. राठोड, उपअग्निशमन केंद्र अधिकारी एस. एस. कुलकर्णी व एच. वाय. घुगे, ड्युटी अधिकारी वैभव बाकडे तसेच अग्निशामक जवान दीपक गाडेकर, अजिंक्य भगत, अक्षय नागरे, मतीन शेख, संकेत निकाळजे आणि उमेश भोसले यांनी या कारवाईत सहभाग घेतला. चालक-यंत्रचालक किशोर कोळी आणि जगदीश सलामबाद यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाने तातडीने केलेल्या कारवाईमुळे पुढील अनर्थ टाळण्यास मदत झाली. मात्र, आगीचे नेमके कारण, तसेच या घटनेत झालेल्या नुकसानीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित