दुष्काळग्रस्तांच्या दिवाळीत गोडवा आणा! ‘आनंदाचा शिधा’ देण्याची अब्दुल सत्तार यांची शासनाकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ९ :- राज्यातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशा परिस्थितीत दसरा आणि दिवाळी हे सण आनंदात साजरे करता यावेत, यासाठी राज्य सरकारने नागरिकांना साखर, खाद्यतेल, रवा, डाळ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेला ‘आनंदाचा शिधा’ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे साकडे घातले आहे.
दुष्काळामुळे सर्वसामान्यांवर आर्थिक संकट
आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या पत्रात सिल्लोड-सोयगाव तालुक्यासह राज्यातील विविध भागांतील दुष्काळी परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन प्रभावित झाले असून, त्याचा परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या दैनंदिन खर्चावरही होत आहे. अशा स्थितीत सणासुदीच्या काळात घरखर्च भागविणे अनेक कुटुंबांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.
पूर्वीच्या योजनेच्या धर्तीवर निर्णय घेण्याची मागणी
यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सणांच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना साखर, तेल, रवा आणि डाळ यांसारख्या आवश्यक वस्तू अत्यल्प दरात देण्यासाठी ‘आनंदाचा शिधा’ योजना राबविण्यात आली होती. याच धर्तीवर यंदाही दुष्काळग्रस्त भागांतील नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका अब्दुल सत्तार यांनी मांडली आहे.
शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा
दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकरी कुटुंबांसह आर्थिक अडचणीत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने नागरिकांच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ‘आनंदाचा शिधा’ उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
आता शासन या मागणीवर काय निर्णय घेते आणि दुष्काळग्रस्त कुटुंबांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळतो का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र वाणी