गणेशपूरच्या जागृत गणपती मंदिरातील चोरीचा पिशोर पोलिसांकडून छडा; दोन आरोपी अटकेत, चांदीचा मुकुट आणि मोदक हस्तगत
कन्नड/ पिशोर दि ९ :- गणेशपूर येथील जागृत गणपती मंदिरातून चांदीचा मुकुट आणि चांदीचा मोदक चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा पिशोर पोलिसांनी उलगडा केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. या गुन्ह्यात एकूण तीन आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ ते ३० सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेदरम्यान गणेशपूर येथील जागृत गणपती मंदिरातील गणपतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि मूर्तीसमोरील चांदीचा मोदक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पिशोर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सलग चार दिवस तांत्रिक विश्लेषण आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास केल्यानंतर संशयित आरोपी शिर्डी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाने शिर्डी येथे जाऊन भगवान सिंद दिलीपसिंग परदेशी (रा. शिर्डी) आणि अनिल हिरालाल बेडवाल (रा. छत्रपती संभाजीनगर) या दोघांना ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अटक केली.
पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरीस गेलेला चांदीचा मुकुट आणि चांदीचा मोदक असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यामुळे मंदिरातील चोरीच्या या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. मात्र, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तिसऱ्या आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) आणि सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री (उपविभाग कन्नड) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक शाम गवळी, पोलीस हवालदार दत्तात्रय मोरे व कैलास करवंदे, पोलीस नाईक फिरोज बरडे व सुनील भिवसणे, पोलीस कॉन्स्टेबल कौतिक सपकाळ, पवन खंबाट, साई घुगे व करण म्हस्के, सायबर गुन्हे शाखेचे योगेश तरमाळे तसेच एसडीपीओ कार्यालय, शिर्डी येथील सहायक फौजदार इरफान शेख यांनी सहभाग घेतला.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि तपास पथकाच्या पाठपुराव्यामुळे जागृत गणपती मंदिरातील चोरीचा उलगडा करण्यात पिशोर पोलिसांना यश आले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित