दुष्काळाच्या झळा जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी बांधावर; पीक पाहणीसह शेतकऱ्यांशी थेट संवाद
पंचनामे वस्तुनिष्ठ करा; पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही : जिल्हाधिकारी विनय गौडा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ३ :- जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज विविध गावांतील शेतशिवारांना भेट देत पिकांच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
जिल्हाधिकारी गौडा यांनी माळीवाडा (ता. छत्रपती संभाजीनगर), सराई (ता. खुलताबाद), वारेगाव (ता. फुलंब्री) आणि चौका (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसराचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी शेतातील पिकांची सद्यस्थिती, पिकांचे झालेले नुकसान तसेच संभाव्य उत्पादनातील घट याची प्रत्यक्ष पाहणी केली.
दुष्काळी परिस्थितीत शासनाच्या मदतीसाठी करण्यात येणारे पंचनामे वस्तुनिष्ठ आणि अचूक पद्धतीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. शेतकऱ्यांनी सकारात्मक राहून पंचनामे करण्यासाठी शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
“शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. याची खात्री मी स्वतः करणार आहे,” असे जिल्हाधिकारी गौडा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व पाणी, टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा छावण्यांची आवश्यकता आणि रोजगाराच्या उपलब्धतेचा यावेळी आढावा घेण्यात आला.
पिण्याच्या पाण्याच्या साठ्यांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा तातडीने बंद करून उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी संरक्षित करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाच्या निकषांनुसार आवश्यक मदत व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच पाणी बचत, उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर आणि आवश्यकतेनुसार पर्यायी पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार, तहसीलदार शिवानंद बिडवे, तसेच छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद व फुलंब्री तालुक्यांतील कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.
अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज