पदवीधर मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक बदल; कलाग्राम ते पाम हॉटेल मार्ग बंद

पदवीधर मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक बदल; कलाग्राम ते पाम हॉटेल मार्ग बंद

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कलाग्राम ते पाम हॉटेल हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

मतमोजणीची प्रक्रिया एमआयडीसी चिकलठाणा येथील प्लॉट क्रमांक ई-५४, एम/एस रेझोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे होणार आहे. या ठिकाणी नागरिकांची आणि वाहनांची गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.

हे असतील पर्यायी मार्ग

१. एपीआय कॉर्नर ते नारेगाव रोड : एपीआय कॉर्नर येथून मास्को कॉर्नरवर उजवीकडे वळून एम. सिडको पोलीस ठाणे मार्गे ब्रेडी कंपनी रोडने नारेगाव रोडकडे जाता येईल.

२. एपीआय कॉर्नर ते वाळूज/नारेगाव परिसर : एपीआय कॉर्नर, मास्को कॉर्नर, कलाग्राम आणि लहुजी साळवे चौक मार्गे वोक्हार्ट व नारेगावच्या दिशेने जाता येईल.

३. वोक्हार्टकडून चिकलठाणा एमआयडीसीकडे : वोक्हार्ट येथून लहुजी साळवे चौक, नारेगाव आणि एमआयडीसी मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे.

४. तथागत चौक ते नारेगाव : तथागत चौक येथून हरमन कंपनी मार्गे जय भवानी चौक आणि पुढे नारेगावकडे जाता येईल.

अत्यावश्यक सेवांना सूट

ही वाहतूक अधिसूचना पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही. अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३१ तसेच अन्य लागू फौजदारी कायद्यांनुसार कारवाई होऊ शकते.

मतमोजणीच्या दिवशी संबंधित परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र वाणी — सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित